बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार व काकतीवेस या रस्त्यांच्या चौकामध्ये जलवाहिनी दुरुस्तीसाठी एल अँड टी कंपनीने तब्बल 15 -20 दिवसांपासून खड्डा खोदून ठेवला आहे. परिणामी गर्दीच्या वेळी ये-जा करणे कठीण होत असल्याने पादचारी व वाहनचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार व काकतीवेस या रस्त्यांच्या चौकामध्ये एल अँड टी कंपनीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सदर चौक हा शहराच्या मध्यवर्तीय भागातील सततची गर्दी असलेला चौक आहे हे लक्षात घेऊन एल अँड टी कंपनीचे अधिकारी जलवाहिनी दुरुस्तीचे त्वरेने पूर्ण करतील अशी अपेक्षा होती.
तथापि आता जवळपास 15-20 दिवस झाले तरी खोदलेला खड्डा आहे तसा आहे. सदर खड्डा आणि त्याच्या शेजारील मातीचा ढिगारा यामुळे गणपत गल्ली, खडेबाजार, काकतीवेस या मार्गावर ये-जा करणाऱ्यांना पादचारी व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्यावर खोदलेल्या या खड्ड्यामुळे सदर चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. याचा फटका विशेष करून गंभीर आजारी रुग्णांना हॉस्पिटलकडे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना बसत आहे. याखेरीज स्थानिक दुकानदार आणि किरकोळ विक्रेत्यांना जलवाहिनी दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यांना धूळमातीचा त्रास सहन करावा लागत असून चौकात रस्त्यावर कपडे वगैरेंची विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना आपल्या बस्तान अन्यत्र हलवावे लागले आहे. सदर चौकात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वात गंभीर बनला आहे.
तरी एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष द्यावे आणि सदर चौकातील हाती घेतलेले जलवाहिनी दुरुस्तीचे काम त्वरेने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.





