बेळगाव लाईव्ह: खानापूर शहरातील फिश मार्केट परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी होण्याची घटना घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम निर्माण झाला. परिणामी नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
सदर रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. संबंधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याने त्यांनी रस्ता करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे रस्ता अर्धवट राहिला असून तो वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. सध्या या मार्गावरून दुचाकी जाण्यासाठी केवळ एका बाजूला असलेल्या खड्ड्यातून अरुंद पायवाट तयार झाली आहे. याच पायवाटेवरून नागरिक व प्रवासी मोठ्या कसरतीने ये-जा करत आहेत.
दरम्यान, दुचाकींसाठी असलेल्या या अरुंद पायवाटेवरून ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोल जाऊन ट्रॅक्टर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात ट्रॅक्टर चालकास कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, ट्रॅक्टर पलटी झाल्याने या मार्गावरील दुचाकी वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला जात आहे. अर्धवट रस्ता, प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न आणि योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत करावी तसेच रस्त्याच्या कामाबाबत आणि मोबदल्याच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.





