बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील शिशु विकास योजनेचे कामकाज वारंवार ठप्प होण्यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे. खानापूरचे CDPO लक्ष्मण बजंत्री यांच्या निष्काळजीपणा व सातत्याने गैरहजेरीमुळे गृहलक्ष्मी व पंचगॅरंटी योजनांचे काम रखडल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यानही बजंत्री कार्यालयात अनुपस्थित असल्याचे आढळले होते. अंगणवाडी सेविका, समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधींकडून सतत तक्रारी येत होत्या.
आमदारांच्या पत्रानंतर आणि पंचगॅरंटी योजनेच्या बैठकीत ठराव मंजूर झाल्यानंतर अखेर महिला व बालविकास विभागाने कठोर पाऊल उचलले.
360 अंगणवाडी केंद्रांवर योग्य देखरेख न ठेवणे, बैठकींना गैरहजर राहणे आणि आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सरकारने शिस्तभंग कारवाई सुरू केली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत बजंत्री निलंबित राहणार आहेत.
या कारवाईमुळे खानापूर तालुक्यातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरळीत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





