बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या चालकावर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ला प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वेळीच हस्तक्षेप केल्याने जखमी चालकाचे प्राण वाचले असून, या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास क्लब रोडवरील ईफा हॉटेलजवळ ही घटना घडली. जखमी बसवंत याचा मित्र मदन याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी मोनाप्पा आणि संपत यांनी दिलेल्या चिथावणीवरून शिवय्या आणि मितेश या दोघांनी बसवंतवर चाकूने सपासप वार केले. या चौघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेले आयपीएस अधिकारी रवींद्र गडादी यांनी या थराराचे वर्णन केले. गडादी म्हणाले की, “दुपारी जेवणासाठी घरी जात असताना ईफा हॉटेलजवळ दोन तरुण एका व्यक्तीवर चाकूने वार करत असल्याचे दिसले. मी तातडीने गाडी थांबवून त्यांच्या दिशेने धावलो.

पोलीस अधिकारी समोर असूनही ते गुन्हेगार निर्घृणपणे वार करत होते. त्यांच्या डोळ्यात कमालीचा द्वेष होता. शेवटी मी चालकाला पिस्तूल आणायला सांगितल्याबरोबर ते तिथून पळून गेले.” गडादी यांनी जखमीला तात्काळ विजया हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे तो मृणाल हेब्बाळकर यांचा चालक असल्याचे निष्पन्न झाले.
यावेळी गडादी यांनी घटनास्थळावरील नागरिकांच्या मानसिकतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “हल्ला होत असताना तिथे १५-२० लोक उभे राहून हा प्रकार पाहत होते. मी मदतीसाठी हाक मारली तरी कोणीही पुढे आले नाही. जर नागरिकांनी वेळीच हिंमत दाखवली असती, तर गुन्हेगारांना जागीच पकडता आले असते,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. एका पोलीस अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे या घटनेत मोठा अनर्थ टळला असे त्यांनी म्हटले.




