बेळगाव लाईव्ह : खादरवाडी परिसरातील रस्त्याची झालेली दुरवस्था आणि प्रशासनाचे त्याकडे असलेले दुर्लक्ष याविरोधात श्रीराम सेना हिंदुस्थानचे नेते आणि शेतकरी कार्यकर्ते राजेश (राजूदादा) पाटील यांनी पुकारलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. १ जानेवारी रोजी सकाळी ११ पासून त्यांनी क्लब रोडवरील पंचायत राज ग्रामीण विकास कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खादरवाडीचा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदने दिली, तक्रारी केल्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
अलीकडेच याच खराब रस्त्यामुळे शाळकरी मुलांचा एक भीषण अपघात झाला होता, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर ग्रामस्थांचा संयम सुटला असून आता केवळ ‘पॅचवर्क’ नको तर कायमस्वरूपी रस्ता हवा, ही मागणी राजेश पाटील यांनी लावून धरली आहे.

आज उपोषणाचा दुसरा दिवस असून राजेश पाटील यांनी कोणतेही अन्न ग्रहण केलेले नाही. या आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी विचारले की, “आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही रस्ता का केला जात नाही? यामागे नेमके कोणते राजकारण सुरू आहे?” कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास आणि पंचायत राज कार्यालयाच्या उंबरठ्यावर सुरू असलेल्या या उपोषणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जोपर्यंत रस्त्याच्या कामाचे ठोस आश्वासन आणि प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला खादरवाडीतील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.




