बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष टी. श्याम भट्ट यांनी बुधवारी बेळगावमधील विविध सरकारी वसतिगृहांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सदाशिवनगर येथील समाज कल्याण विभागाचे मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर मुलींचे वसतिगृह, तसेच सुभाषनगरमधील अल्पसंख्याक आणि डी. देवराज अर्स मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पाहणी दरम्यान अध्यक्षांनी विद्यार्थ्यांच्या खोल्या, स्वयंपाकगृह आणि कोठार घरांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना सकस आहार देण्यासोबतच परिसरात स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड करू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसेच, वसतिगृहातील विद्यार्थिनींची नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आयोगाचे सदस्य एस. के. वंटगोडी यांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित असल्याची खात्री करून घेतली. विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत हयगय करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीवेळी समाज कल्याण विभागाचे संयुक्त संचालक रामनगौडा कन्नोळी, अल्पसंख्याक कल्याण अधिकारी एफ. यू. पुजारी, तहसीलदार बसवराज नागराळ उपस्थित होते. वसतिगृहांची पाहणी पूर्ण केल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी आपला मोर्चा बेळगाव मध्यवर्ती कारागृहाकडे वळवून तिथेही पाहणी केली.




