बेळगाव लाईव्ह :हिंदू संमेलन समिती, कपिलेश्वर विभाग बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाद्वार रोड येथील धर्मवीर छ. संभाजी महाराज उद्यानामध्ये विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली.
बेळगावमध्ये आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. चौधरी यांनी सांगितले की, सदर विराट हिंदू संमेलन आयोजनाचा मुख्य उद्देश अलीकडे विविध कारणांनी जो सर्व हिंदू समाज थोडा विभागला गेला आहे, त्याने संघटित होऊन आपली प्रगती साधावी हा आहे. संमेलना दिवशी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी उद्यानापासून दिंडी निघणार असून वैविध्यपूर्णरचना असलेल्या या दिंडीमध्ये शितोळे सरकारांचे माऊलींचे अश्व ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे.
दरवर्षी आषाढी कार्तिकीला हे मानाचे अश्व प्रचंड मोठ्या दिंडीचे नेतृत्व करत आळंदीहून पंढरपूरपर्यंत प्रवास करत असतात. हिंदू संमेलनाच्या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या पथकांसह महिलावर्गाचा सहभाग लक्षणीय असणार आहे. मुख्य म्हणजे हिंदू धर्म जगणाऱ्या वेद, उपनिषद, पुराण वगैरे धर्मग्रंथांची आम्ही पालखीतून सवाद्य मिरवणूक काढणार आहोत.
जेणेकरून हिंदू समाजाला समजलं पाहिजे की आपला धर्म कोठून आला आहे. कारण आपला धर्म हा अत्यंत पुरातन असून तो आपल्या लोकांना कळावा या दृष्टिकोनातून हे हिंदू संमेलन आम्ही आयोजित केले आहे. याखेरीज हिंदू समाजातील मरगळलेली भावना दूर करून जागृती निर्माण व्हावी, हिंदू अस्मिता जागृत व्हावी या दृष्टीने हा एक प्रयास आम्ही सर्व आयोजक मंडळी करत आहोत. आम्ही केलेली जनजागृती पाहता संमेलनाला 3 ते 5 हजार इतक्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
या हिंदू संमेलनात बृहन्मठ मुन्नीहाळचे परमपूज्य श्री बसवराज महाराज मार्गदर्शनपर विचार व्यक्त करून आशीर्वाद देणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे सव्यसाची गुरुकुलमचे प्रमुख आचार्य लखन जाधव हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती देऊन तरी बेळगाव शहर परिसरातील समस्त हिंदू बंधू-भगिनींनी या संमेलनात मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन संमेलनाध्यक्ष अनिल चौधरी यांनी शेवटी केले. पत्रकार परिषदेस सुनील कणेरी यांच्यासह हिंदू संमेलन समिती, कपिलेश्वर विभागाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.





