बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शहरात गर्दीच्या वेळेत जड वाहनांच्या वाहतुकीवर तातडीने निर्बंध घालावेत, अशी मागणी सिटीझन कौन्सिल, बेळगाव यांच्या वतीने पोलीस आयुक्त भूषण जी. बोरसे (आयपीएस) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या तिसरे व चौथे रेल्वे गेट बांधकामामुळे बंद असल्याने सर्व वाहतूक कॉंग्रेस रोडवरील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटकडे वळविण्यात आली आहे. हे दोन्ही गेट पूर्व व पश्चिम टिळकवाडी तसेच शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणारे मुख्य दुवे असल्याने दिवसभर या परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होत आहे.
शहरात १७ हून अधिक शाळा, २० पेक्षा जास्त महाविद्यालये, उद्यमबाग औद्योगिक परिसर, अनेक मोठी रुग्णालये, रेल्वे स्थानक, दोन प्रमुख बसस्थानके तसेच व्यापारी संकुले ही सर्व केंद्रे याच मुख्य मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच दररोज हजारो ऑटो रिक्षा, खाजगी वाहने आणि दुचाकींच्या वाहतुकीमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
या मार्गांवरून जड वाहनांची अनियंत्रित वाहतूक सुरू असल्याने रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांना अडथळे निर्माण होत असून, पादचारी, विद्यार्थी आणि रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातामुळे हा धोका अधिकच ठळक झाला असून, शहरातील रस्ते अपघातांची मालिका चिंताजनक असल्याचे नागरिक परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर हद्दीत जड वाहनांवर तात्काळ बंदी घालावी किंवा ठराविक वेळेतच प्रवेश द्यावा, कॉंग्रेस रोड आणि रेल्वे गेट परिसरात जड वाहनांना पूर्णपणे प्रतिबंध घालावा, तसेच बायपास व बाहेरील मार्गांचा सक्तीने वापर करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण राबवावे आणि वाहतूक पोलीस व आरटीओमार्फत कडक अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीची उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नमूद करत नागरिक परिषदेकडून पोलीस व जिल्हा प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करत सांगितले की, सध्या लॉरी मालक, ऑटो चालक आणि विविध संघटनांशी या विषयावर चर्चा सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. नागरिकांची सुरक्षितता हेच प्राधान्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, विकास कलघटगी, मुकेश खोडा, नितेश जैन, राजू पालीवाला आदी उपस्थित होते.





