बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात वाढत्या रस्ता अपघातांची संख्या आणि वाहतूक कोंडीची गंभीर समस्या लक्षात घेता, शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याबाबत पोलीस आयुक्त भूषण बोरसे (आयपीएस) यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी वेळ निश्चित करण्याच्या दृष्टीने ट्रक चालक व त्यांच्या संघटनांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील रस्ता सुरक्षेबरोबरच व्यापारी आणि औद्योगिक चटुवटींवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेत योग्य वेळापत्रक अंतिम करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की, नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीचा सुरळीत प्रवाह आणि व्यापारी गरजांचा समतोल राखत पुढील दहा दिवसांत जड वाहनांच्या प्रवेशासाठी नवीन वेळापत्रक अंतिम करण्यात येईल.
याच बैठकीत शहरातील दूरमार्ग बस सेवांबाबतही चर्चा करण्यात आली. बस चालक व व्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेनुसार शहरात नवीन पिकअप व ड्रॉप पॉईंट्स निश्चित करण्यासोबतच बससाठी स्वतंत्र पार्किंग स्थळे ओळखण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेस प्राधान्य देत हे निर्णय घेतले जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

ट्रक चालक संघटना आणि इतरांची चर्चा करून आगामी दहा दिवसात अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती ही पोलीस आयुक्त बोरसे यांनी बेळगाव लाईव्ह बोलताना दिली.
बैठकीदरम्यानच सिटीजन कौन्सिलच्या शिष्टमंडळाने बेळगाव शहरात व्यस्त वेळेत अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी करत निवेदन सादर केले. त्यामुळे ट्रक मालकांसोबत सुरू असलेली बैठक आणि सिटीजन कौन्सिलच्या निवेदनामुळे अवजड वाहनांवरील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना अधिक बळ मिळाल्याचे सांगण्यात आले.





