बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी आणि मच्छे परिसरात आयोजित शोभायात्रेदरम्यान धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील हिंदू कार्यकर्त्या हर्षिता ठाकूर यांच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विशिष्ट प्रार्थनास्थळाच्या संदर्भात आक्षेपार्ह कृत्य आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मच्छे गावात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत हर्षिता ठाकूर सहभागी झाल्या होत्या. या यात्रेदरम्यान एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने त्यांनी धनुष्यबाणातून बाण सोडल्याप्रमाणे हातवारे केले. हे कृत्य दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावणारे आणि परिसरात अशांतता पसरवणारे असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
हर्षिता ठाकूर यांच्यावर केवळ आक्षेपार्ह हातवाऱ्यांचाच नव्हे, तर प्रक्षोभक भाषण केल्याचाही आरोप आहे. आपल्या भाषणातून त्यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सामाजिक शांतता धोक्यात आणणारी विधाने केल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

याप्रकरणी अब्दुल कादर मुजावर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हर्षिता ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
पिरनवाडी आणि आसपासच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





