बेळगाव लाईव्ह : बाळेकुंद्री बी.के. येथील पंतनगरमधील अंबिका प्लायवूड अँड हार्डवेअर सॅनिटरी या दुकानातील चोरी प्रकरणी मारीहाळ पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या जवळील 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे हार्डवेअर साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव मुकेश गणपती जाधव (वय 38, रा. आनंदनगर खानापूर) असे आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात बाळेकुंद्री बी.के. येथील पंतनगरमधील अंबिका प्लायवूड अँड हार्डवेअर सॅनिटरी हे दुकान फोडून किंमती साहित्य चोरण्यात आल्याची तक्रार मारीहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.
याप्रकरणी बेळगाव ग्रामीण उपविभागाचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तपास कार्य हाती घेतले होते. तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून मुकेश जाधव याला ताब्यात घेतले.
त्यावेळी पोलीस चौकशीत मुकेश याने चोरीचा गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्या जवळील 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे हार्डवेअर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




