बेळगाव लाईव्ह : अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध डावलून सुरू असलेल्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामादरम्यान ठेकेदाराशी झालेल्या वादावादी झटापटीत एका शेतकरी जखमी होऊन त्याची प्रकृती बिघडल्याची, परिणामी संतप्त शेतकऱ्यांनी बायपासचे काम बंद पाडून संताप व्यक्त केल्याची घटना गुरुवारी घडली.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला विरोध करताना स्वास्थ बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव सुरेश नागेंद्र मऱ्याकाचे (रा. हालगा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार हालगा -मच्छे बायपास रस्त्यासाठी आपली उरलीसुरली जमीनही ताब्यात घेतली जात असल्याचे लक्षात येताच गेल्या चार दिवसापासून मऱ्याकाचे त्याला विरोध करत होते. त्यातून आज रस्त्याचा ठेकेदार व त्याचे लोक आणि सुरेश मऱ्याकाचे यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादावादीचे पर्यवसान सुरेश यांना धक्काबुक्की करण्यामध्ये होऊन त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले.
दरम्यान सदर प्रकाराची माहिती मिळताच संतप्त शेतकऱ्यांनी आपले नेते प्रकाश नायक, राजू मरवे आदींच्या बायपासच्या ठिकाणी दाखल होऊन रस्त्याचे काम बंद पाडले. त्याचप्रमाणे घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना बायपासच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर कसा अन्याय केला जात आहे याची थोडक्यात माहिती देऊन सदर रस्त्याचे काम तात्काळ बंद करावे, अशी जोरदार मागणी शेतकरी नेत्यांनी केली.
घटनास्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी सांगितले की, परवा आमच्या उच्च न्यायालयाच्या वकिलांसमोर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालय आणि खालच्या न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो असे सांगून आपण शेतकऱ्यांसोबतच असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचे निर्देश पाहिल्यानंतर हालगा -मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प हा बेकायदेशीर असल्याचे आणि उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे. तसेच आपण आपल्या कायदे सल्लागार आणि वरिष्ठांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

ही वस्तुस्थिती असल्यामुळे यापुढे या रस्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असे प्रकाश नाईक यांनी स्पष्ट केले. शेतकरी नेते राजू मरवे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कशाप्रकारे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय करत बेकायदेशीररित्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम केले जात आहे याची थोडक्यात माहिती दिली. तसेच जीव जाईपर्यंत आम्हा शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध असेल, असे मरवे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सुरेश मऱ्याकाचे यांनी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, हालगा-मच्छे बायपास रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या रस्त्याच्या ठिकाणी असलेली माझ्या वडिलांची 20 गुंठे सुपीक शेतजमीन कर्नाटक सरकारने जबरदस्तीने ताब्यात घेऊन उध्वस्त केली आहे. त्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर आले आहे.
आमच्या शेताची थोडीफार जमीन शिल्लक होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून डंपर भरून बोल्डर आणून त्या जमिनीचेही सपाटीकरण केले जात असल्यामुळे आज मी त्याला विरोध केला. त्यावेळी माझ्यावरच दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली. माझ्या मोबाईल फोन देखील फोडण्यात आला. सदर प्रकारामुळे दुखापत होण्याबरोबरच रक्तदाब वाढल्याने मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. त्याला संपूर्णपणे कर्नाटक सरकार जबाबदार आहे जबाबदार आहे. आम्हा अल्पभूधारक शेतकऱ्यांवर सुरू असलेला अन्याय इतका मोठा आहे की आम्ही देशोधडीला लागलो आहोत. माझी उरलीसुरली 10 गुंठे जमीन होती त्यामध्ये देखील हाय टेन्शन इलेक्ट्रिक खांब बसवून ती जमीन उध्वस्त करण्यात आली आहे.
बायपासमध्ये शेतजमीन गेल्यामुळे माझ्या वडिलांचे मानसिक संतुलन बिघडून गेल्या 1 जानेवारी 2026 रोजी त्यांचे निधन झाले. माझी आई तर आपली शेतजमीन जाणाऱ्या या धसक्याने अर्धांगवायूचा झटका येऊन गेल्या 9 महिन्यापूर्वी मरण पावली. हे सर्व कर्नाटक सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केल्या जाणाऱ्या अन्यायामुळे घडले आहे. अन्याय एक दिवस माझ्याही जीवावर बेतू शकतो असे सांगून तेव्हा आता तरी सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शेवटी सुरेश मऱ्याकाचे यांनी केली.
जनतेचा एखाद्या प्रकल्पाला सातत्याने तीन-चार वर्षे विरोध झाला तर तथ्य जाणून सरकार तो प्रकल्प रद्दबातल करते. तथापि बेळगाव येथील तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतून रस्ता करण्यास अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असूनही उभ्या पिकावर बुलडोझर फिरवून हालगा -मच्छे बायपास रस्ता केला जात आहे. गेल्या 2002 पासून ते आजपर्यंत बेकायदेशीररित्या तसेच बेळगावचा झिरो पॉईंट गृहीत न धरता थोडक्यात कायद्याचा आदर न करता हालगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचा आरोप आहे.
उच्च न्यायालयाने झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय बायपासमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे, पीकांचे कोणतेही नुकसान करु नये अशी सक्त ताकीद देऊनही तो आदेश पायदळी तुडवत प्रशासन, महामार्ग प्राधिकरण खाते आणि ठेकेदारांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत बायपासची निर्मिती करण्याचा आपला अट्टाहास कायम ठेवला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचा बायपासला तीव्र विरोध असून त्यांचा असंतोष अद्याप धगधगताच आहे.
शेतकऱ्यांनी ज्या शेतकरी वर्गाच्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत त्या ठिकाणीचे काम बंद केले शुक्रवारी शेतकरी पुन्हा जिल्हाधिकारी यांना भेटणार आहेत.





