बेळगाव लाईव्ह : मूडलगी तालुक्यातील महसूल विभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे ₹1 कोटी 13 लाखांची पीक नुकसानभरपाई पात्र शेतकऱ्यांना न देता अपात्र व्यक्तींच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी केला आहे.
शुक्रवारी बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गडाद म्हणाले की, 2023 साली झालेल्या पीक नुकसानीच्या प्रकरणात महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून कोणतीही योग्य पाहणी न करता लाभार्थ्यांची निवड केली.
सरकारने निश्चित केलेल्या गावांच्या यादीत नसलेल्या गावांतील तसेच अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळ व पीक नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली, तर खरे नुकसानग्रस्त शेतकरी आजही वंचित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सर्व कागदपत्रांसह 10 जून 2024 रोजी सरकारकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही भीमप्पा गडाद यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे मूडलगी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.





