बेळगाव लाईव्ह :समाजाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षक, पत्रकार आणि पोलिसांच्या योगदानाचा गौरव करत वेदांत फाऊंडेशनने शनिवारी टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघात एक्सलन्स पुरस्कार प्रदान केले. या तिन्ही घटकांमुळेच सुदृढ, शिस्तबद्ध आणि जागरूक समाज घडतो, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल तथा उद्योजक अशोक नाईक यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आर. एम. चौगुले होते. प्रमुख वक्ते अशोक नाईक यांनी शिक्षक ज्ञानदानातून, पत्रकार समाजप्रबोधनातून आणि पोलिस कायदा-सुव्यवस्थेतून समाजाचा कणा मजबूत करतात, असे सांगत उदाहरणांसह त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक महापौर मंगेश पवार यांनी शिक्षक, पत्रकार व पोलिसांबरोबरच सफाई कामगारांचेही समाजासाठी मोलाचे योगदान असल्याचे नमूद करत, त्यांच्या कार्याचाही गौरव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्लास्टिकमुक्त बेळगावसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपमहापौर वाणी जोशी यांनी शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून, आजच्या फास्ट फूड संस्कृतीमुळे वाढणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे मत मांडले.

गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी निरंजनराजे अर्स, झुआरी अॅग्रो केमिकलचे माजी उपायुक्त आर. वाय. पाटील, संतोष जैनोजी, लिंगराज जगजंपी, वीरेश किवडसण्णावर आदींनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारप्राप्तांचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात आर. एम. चौगुले यांनी चांगले शिक्षक, निर्भीड पत्रकार आणि कर्तव्यदक्ष पोलिस हेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात, असे स्पष्ट केले.
पत्रकारांच्या वतीने बी. बी. देसाई, तर शिक्षकांच्या वतीने शेखर करंबेळकर यांनी भावना व्यक्त केल्या. व्यासपीठावर सीए जीवन शहापूरकर, धनश्री सोसायटीचे अध्यक्ष नितीन येतोजी, व्ही. के. श्रृंगेरी, फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, संस्थापक सतीश पाटील, उपाध्यक्ष कल्लाप्पा कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले, तर स्वागत सचिव एन. डी. मादार यांनी केले.
सन्मानित मान्यवर
वेदांत फाऊंडेशनतर्फे दै. पुढारीचे मुख्य प्रतिनिधी जितेंद्र शिंदे, सकाळचे बी. बी. देसाई, संयुक्त कर्नाटकचे विलास जोशी, शिक्षक शेखर करंबेळकर, युवराज रत्नाकर, कल्लाप्पा पाटील, उमेश बाळेकुंद्री, पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील व हेड कॉन्स्टेबल श्रीकांत उप्पार यांचा रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.





