बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी असून रेणुका यल्लम्मा मंदिर आणि डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळाने २१५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ११८ कोटी आणि राज्य सरकारचा ९७ कोटी रुपयांचा वाटा असून, या माध्यमातून भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या विकासकामांतर्गत ८ हजार भाविकांची क्षमता असलेले भव्य रांग संकुल आणि एकाच वेळी ४ हजार भाविक बसू शकतील अशा भोजन कक्षाची उभारणी केली जाणार आहे.
तसेच डोंगरावर येणाऱ्या बैलगाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून, तिथे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची सोयही केली जाईल. याशिवाय २५ अद्ययावत स्वच्छतागृह संकुलेही उभारण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

भाविकांच्या सोयीसाठी अनेक लहान-मोठ्या विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून, तेलकुंडात स्नान करणाऱ्या आणि थेट दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली जाईल. यासोबतच एक प्रशासकीय इमारतही बांधण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यकारी एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या कामाची निविदा प्रक्रिया ३० जानेवारी रोजी पूर्ण होणार असून १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, पर्यटन मंत्री एच. के. पाटील, धर्मादाय विकास मंत्री रामलिंगा रेड्डी आणि स्थानिक आमदारांचे पूर्ण सहकार्य लाभत आहे. ही सर्व विकासकामे एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




