बेळगाव लाईव्ह : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ॲमेझॉनसह विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
ॲमेझॉन कंपनीचा अधिकृत वितरक म्हणून काम करणारा प्रवीण पद्मराज तडसद (वय 29, रा. जमखंडी, जि. बागलकोट) याने 14 जून 2025 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीत बेळगाव ऑटो नगर परिसरातून ॲमेझॉनव अन्य कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने मार्केट उपविभागाचे माननीय एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापित करण्यात आले. तपासादरम्यान याच कंपनीत काम करणारा शुभम शशिकांत डिंडे (वय 29, रा. शिवाजीनगर दुसरी मेन, बेळगाव) याला 5 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपीकडून विविध कंपन्यांचे 18 स्मार्ट फोन, 1 टॅब, 5 स्मार्ट वॉच, 1 गिंबल स्टॅबिलायझर, एअरपॉड्स व हेडफोन असा एकूण ₹4,49,321/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तलवार, श्रीशैल हुलगेरी, उदय पाटील, पी. एम. मोहिते तसेच माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आणि तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या सर्वांच्या कार्याची दखल घेत बेळगाव शहराचे माननीय पोलीस आयुक्त यांनी पथकाचे प्रशंसापूर्वक कौतुक केले आहे.




