बेळगाव लाईव्ह: भगवान गौतम बुद्ध व राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या मूर्ती स्थापनेसाठी आवश्यक असणारी परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याबद्दल कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे आज सकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती करण्याच्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी केली जात आहे. त्याचप्रमाणे केएलई जवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौकात छत्रपती शाहू महाराजांची मूर्ती उभारण्यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देणार आहेत. तथापि सदर मूर्ती बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी अर्थात ‘ना हरकत’ पत्र आवश्यक असताना ते देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीतर्फे आज किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शने करून संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती उभारण्याची तयारी बेळगाव महापालिकेने दर्शवली असली तरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून परवानगी मिळेपर्यंत मूर्ती उभारणीचे काम हाती घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने मूर्ती उभारण्याच्या परवानगी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आपल्याला काहीच कळवण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या पद्धतीने बुद्धांची मूर्ती उभारण्याच्या दृष्टीने कामाला गती देण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून वेळ काढूपणा केला जात असल्याचे लक्षात येताच कर्नाटक राज्य दलीत संघर्ष समितीने आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेऊन वरील प्रमाणे आंदोलन छेडले.
आंदोलन स्थळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दलित संघर्ष समितीच्या एका नेत्याने सांगितले की, बेळगावच्या किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती उभारावी अशी गेल्या 2016 पूर्वीपासून आम्हा सर्व दलित संघटनांची मागणी होती. त्यानुसार 2016 मध्ये बेळगाव महापालिकेमध्ये किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि केएलई जवळ राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या चौकात राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांची मूर्ती स्थापन करण्याचा ठराव ही मंजूर झाला आहे.
त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कारणामुळे छ. शाहू महाराजांची मूर्ती उभाण्याचे काम प्रलंबित राहिले. स्थलांतराने किल्ला तलाव येथे गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्याची प्रक्रिया देखील रखडली. मात्र आता आम्ही जोरदार आवाज उठवल्यानंतर किल्ला तलाव येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यास महापालिकेकडून कांहीच हरकत नसल्याचे आणि त्या दृष्टीने कागदपत्रांची पूर्तता केली जात असल्याचे, तसेच या कामासाठी आणखी निधी लागला तर तो उपलब्ध करून दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. मूर्ती उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रस्तावही धाडला असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. याखेरीज सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘ना हरकत’ पत्र मिळताच आम्ही उद्याच्या उद्या मूर्ती उभारण्याच्या कामाला सुरुवात करू असेही स्पष्ट केले आहे. त्यासंदर्भात आज आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात आलो असता येथील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

मूर्ती उभारणीच्या परवानगीसंदर्भात कांही कागदपत्रे आली आहेत का? याची साधी पडताळणी करण्याची तसदी देखील न घेता संबंधित अधिकारी आमची दिशाभूल करत आहेत. एकंदर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे वर्तन पाहता त्यांना आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाही भगवान गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्याशी कांही देणे घेणे नाही, असे वाटते. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करत आहोत. तेंव्हा आता प्रांताधिकाऱ्यांनीच या ठिकाणी येऊन बुद्धांची मूर्ती उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवून द्यावे असे सांगून जोपर्यंत प्रांताधिकारी आमच्या या मागणीची पूर्तता करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे धरणे आंदोलन मागे घेणार नाही, असे दलित संघर्ष समितीच्या त्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या आजच्या धरणे आंदोलनात विभागीय संचालक रवी बस्तवाडकर, राज्य संघटना संचालक कल्लाप्पा रामचन्नावर, जिल्हा संघटना संचालक संतोष कांबळे, बेळगाव तालुका अध्यक्ष मनोज हित्तलमणी आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.





