बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पूर्णपणे गांजा आणि व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी, यापुढे अशा अपघातांना ‘अपघात’ न मानता थेट ‘खुनाचा गुन्हा’ मानले जाईल, अशी कठोर भूमिका पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व ३४ पोलीस ठाण्यांना विशेष ‘ड्रग डिटेक्शन किट्स’ पुरवण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानामुळे गांजा ओढणाऱ्या व्यक्तीची तात्काळ ओळख पटवून त्याच्यावर गुन्हा दाखल करणे सोपे होणार आहे. केवळ गांजा विकणारेच नव्हे, तर त्याचे सेवन करणारेही आता पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून त्यांची रवानगी तुरुंगात केली जाणार आहे.

रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्यासाठी एसपींनी ढाबे आणि मद्यविक्री केंद्रांना तंबी दिली आहे. कोणत्याही हॉटेल किंवा ढाब्यावर बेकायदा दारू सापडल्यास त्यांचा व्यवसाय परवाना कायमचा रद्द केला जाईल. विशेष म्हणजे, एखाद्या मद्यपी ग्राहकाने वाहन चालवून अपघात केल्यास, त्या ग्राहकाची माहिती पोलिसांना न देणाऱ्या मद्यविक्री केंद्राच्या मालकावरही सह-आरोपी म्हणून कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आता सर्व मद्यविक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून येणाऱ्या गांजाच्या तस्करांवर पोलिसांची करडी नजर असून, जामिनावर सुटून पुन्हा अवैध कृत्यांकडे वळणाऱ्या गुन्हेगारांना बेळगाव जिल्ह्यातून थेट तडीपार करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिला आहे.





