बेळगाव लाईव्ह :बेळगावचे केएलई हॉस्पिटल आणि जे एन वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 30 वर्षापासून कार्यरत असलेले ज्येष्ठ कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अनिल हरुगोप्प यांना कोलकाता येथे काल सोमवारी झालेल्या 77 व्या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेदरम्यान स्प्रिंगर नेचर या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेद्वारे ‘सर्वोत्कृष्ट समीक्षक’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार मिळवणारे डॉ. हरुगोप्प हे कर्नाटकातील पहिले मानकरी असून कान, नाक, घसा (ई.एन.टी.) यांच्या संदर्भातील राष्ट्रीय जर्नल साठी 430 हून अधिक लेखांचे परीक्षण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 100 हून अधिक लेख प्रकाशित करून, 2017 आणि 2018 मध्ये दोनदा राष्ट्रीय संपादकीय मंडळाचे सदस्य पद भूषविणारे डॉ. अनिल हरुगोप्प हे उत्तर कर्नाटकातील पहिले कान, नाक, घसा तज्ञ आहेत. त्यांनी 2025 मध्ये कर्नाटक राज्य कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टर संघटनेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.
केएलई सोसायटीचे कुलपती व अध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे, काहेरचे प्रभारी कुलगुरू डॉ. एन. एस. महंतशेट्टी, प्राचार्य व्ही. पट्टणशेट्टी, काहेर निबंध राजेश पवार, डॉ. दयानंद, डॉ. अरिफ मालदार, उपप्राचार्य डॉ बुबनाळे, डॉ नयना,
केएलई हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आर. बी. मेटगुडमठ आणि कान-नाक-घसा विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी स्प्रिंगर नेचर संस्थेचा ‘सर्वोत्कृष्ट समीक्षक’ पुरस्कार मिळविल्याबद्दल डॉ. अनिल हरुगोप्प यांचे खास अभिनंदन केले आहे.





