बेळगाव लाईव्ह : कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक के. रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या व्हिडिओमध्ये ते आपल्या शासकीय कार्यालयात गणवेशात असताना एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ तीन वेगवेगळ्या क्लिप्स जोडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या कार्यालयातच गैरवर्तन करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन होणे हे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचे मत राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे.

या सर्व वादावर स्पष्टीकरण देताना डीजीपी के. रामचंद्र राव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडिओ सुमारे आठ वर्षांपूर्वीचा असून आपण बेळगाव येथे कार्यरत असतानाचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करून आपली प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका विशिष्ट टोळीकडून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. तसेच या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत. यापूर्वी के. रामचंद्र राव हे त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एका सोने तस्करीच्या प्रकरणामुळेही चर्चेत आले होते.
आता या ताज्या व्हिडिओ प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या माध्यमातून या व्हिडिओची सत्यता तपासली जात असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.




