बेळगाव लाईव्ह :जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत सूचनेनुसार, तालुक्यातील गर्भवती महिला आणि प्रसूती झालेल्या मातांनी आपली माहिती आरोग्य विभागात नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मातांना व नवजात बालकांना शासनाच्या आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, गर्भधारणा, प्रसूती तसेच बालजन्माशी संबंधित सर्व नोंदी ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा संबंधित आरोग्य केंद्रामध्ये करणे आवश्यक आहे. जन्म दाखला, आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे वेळेत सादर केल्यास मातृत्व सहाय्य योजना, पोषण आहार योजना, तसेच इतर शासकीय लाभ मिळणे सुलभ होणार आहे.
यासोबतच, नागरिकांनी मृत्यू दाखले, जात व उत्पन्न प्रमाणपत्रे आणि इतर महत्त्वाच्या नोंदीही वेळेत संबंधित कार्यालयात कराव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गर्भवती व प्रसूती महिलांची अचूक नोंदणी झाल्यास माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील.”
प्रशासनाने सर्व नागरिकांना या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





