बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याला भेट देऊन तहसीलदार कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत खानापूर तालुक्यातील आमगाव (आमगांव) गावातील वनवासी नागरिकांच्या स्थलांतराचा विषय, नवीन कंदाय (रेव्हेन्यू) गावांची निर्मिती तसेच खानापूर तालुक्यात वास्तव्यास असलेल्या हक्कीपिक्की व सिद्दी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र देताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
या संदर्भातील समस्यांचे निराकरण कसे करता येईल, यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक सूचना दिल्या. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


या बैठकीला महसूल, ग्रामीण विकास, वन विभाग तसेच अनुसूचित जमाती कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील वनवासी व आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
खानापूर तालुक्यात अनेक समस्यांमुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करून प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.




