बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २७० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. या प्रकल्पाबाबत जनतेची मते जाणून घेण्यासाठी येत्या आठवडाभरात एक जाहीर सभा बोलावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग, सम्राट अशोक रोड, मध्यवर्ती बसस्थानक आणि आरटीओ सर्कल ते चन्नम्मा सर्कलपर्यंतचे काम हाती घेतले जाणार आहे. जाहीर सभेत होणाऱ्या चर्चेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ११६ कोटी रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या प्रत्येक घटकाला आधार देण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच, पावसामुळे पूर्णतः घर कोसळलेल्या प्रसाद माळी या लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने संबंधित लाभार्थ्याला पायाभरणीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, कामाच्या प्रगतीनुसार पुढील हप्त्याचे अनुदान त्वरित दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




