बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा आणि शहर पोलीस दलाने २०२५ या वर्षात अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईचा धडाका दुप्पट झाला आहे. पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, अमली पदार्थांची तस्करी, मटका आणि अवैध जुगार यांवरील कारवाईत मोठी वाढ झाली असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अमली पदार्थ विरोधात मोठी मोहीम पोलिसांनी यावर्षी सर्वात मोठी कामगिरी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत केली आहे. २०२४ मध्ये सप्टेंबरपर्यंत अमली पदार्थांशी संबंधित ५५ गुन्हे नोंदवण्यात आले होते, मात्र २०२५ मध्ये ही संख्या थेट २१० वर पोहोचली आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी राबवलेले हे ‘मिशन’ यशस्वी ठरताना दिसत आहे.
शहरातील आणि ग्रामीण भागातील मटका आणि जुगाराचे जाळे उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. २०२४ मध्ये मटक्याची ९९ प्रकरणे समोर आली होती, त्यात वाढ होऊन यंदा १३१ गुन्हे दाखल झाले आहेत. जुगाराच्या गुन्ह्यांतही वाढ झाली असून यंदा २७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन सट्टेबाजी आणि क्रिकेट सट्टेबाजीवरही पोलिसांची करडी नजर आहे.
अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यावर्षी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अनेक गुन्हे नोंदवून संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. तसेच मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापार रोखण्यासाठी राबवलेल्या मोहिमांमुळे या गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रित करण्यात यश आले आहे.

अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून ६ गुन्हे नोंदवले आहेत. रिअल इस्टेट माफिया आणि मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून होणाऱ्या छळवणुकीच्या तक्रारींची दखल घेऊन पोलिसांनी यंदा कठोर पावले उचलली आहेत.
एकूणच २०२४ मध्ये नोंदवलेल्या २३७ प्रकरणांच्या तुलनेत २०२५ मध्ये आतापर्यंत ४६१ गुन्हे नोंदवून पोलिसांनी अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घातला आहे.




