बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या हिंडलगा कारागृहात बाहेरून मोबाईल आणि अमली पदार्थ फेकले जात असल्याच्या तक्रारी प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. या गंभीर आरोपांची दखल घेत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाची माहिती दिली. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेला व्हिडिओ कोणत्या तारखेचा आणि वेळेचा आहे, याची तांत्रिक तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्हिडिओ कोणत्या कॅमेऱ्यातून चित्रित करण्यात आला आणि त्यातील दृश्ये नेमकी कधीची आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वंकष तपास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी सध्या केआयएसएफ जवान सांभाळत आहेत. व्हिडिओच्या तपासणीनंतर यातील सत्यता समोर येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे कडक पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कारागृहाच्या आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येणार आहे. या संदर्भात ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि केआयएसएफ जवानांची गस्त वाढवली जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.




