बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधीलअतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष शीघ्रगती पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २५ वर्षीय नराधमाला १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
आनंद शिवाजी जंतिकट्टी (वय २५, रा. भारतनगर, खासबाग, सध्या रा. रथगल्ली, जुने बेळगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
९ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपीने पीडित मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून लग्नाचे आमिष दिले आणि आपल्या मोटारसायकलवरून तिचे अपहरण केले. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हलगा गावातील आपल्या चुलतीकडे तिला नेले होते.
तिथे दोन दिवस मुलीला डांबून ठेवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची सखोल सुनावणी घेतली. सरकारी वकील एल. वाय. पाटील यांनी एकूण ९ साक्षीदार आणि ४५ कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे आरोपीवरील आरोप सिद्ध केले. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३६६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच कलम ३६८ अन्वये ७ वर्षे आणि पोक्सो कायद्यांतर्गत ५ वर्षांची शिक्षाही सुनावली आहे.
न्यायालयाने पीडित मुलीच्या भविष्याचा विचार करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून तिला १ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत १५ वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बेळगाव पोलिसांनी या तपासात दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




