belgaum

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे काँग्रेस रोड ठरतोय ‘डेथ स्पॉट’

0
2404
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील काँग्रेस रोडवर आज दुपारी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात बैलहोंगल तालुक्यातील सोमनट्टी येथील ३० वर्षीय तरुण मुत्तय्या शंकरय्या यलगुप्पीमठ याचा जागीच मृत्यू झाला. मुत्तय्या हा आपल्या कुटुंबातील एकटाच आधार होता आणि त्याच्या पश्चात आता कोणीही वारस उरलेले नाही, त्यामुळे सोमनट्टी गावावर शोककळा पसरली आहे. मुत्तय्या हे ज्येष्ठ नागरिकांची सेवा आणि काळजी घेण्याचे काम करत होते.

आज दुपारी पहिल्या रेल्वे गेटकडून हिंडलकोच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड मायनिंग ट्रकने मुत्तय्या यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस रोडवरून येत असलेल्या दुचाकीस्वाराचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली.

अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स आणि अवजड वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळेच असे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 belgaum

या अपघातामुळे बेळगाव महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि पोलिसांच्या सूचनांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा उघड झाले आहे. दक्षिण विभागाचे रहदारी पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस रोडवरील अनावश्यक आणि चुकीच्या पद्धतीने बनवलेले गतिरोधक तातडीने काढणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी आज हा अपघात झाला, तिथे यापूर्वीही भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हा भाग आता ‘अपघात स्पॉट’ म्हणून ओळखला जात आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या निरीक्षणानुसार, रस्त्यावरील सदोष रचनेमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

पहिल्या रेल्वे गेटपासून अनगोळ रोड आणि धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत किती गतिरोधक असावेत आणि रस्त्याची नेमकी स्थिती काय आहे, याचा सविस्तर सर्व्हे करून अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र, महानगरपालिकेने या अहवालाची दखल न घेतल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले ‘कट्स’ (बायपास) आणि गतिरोधकांबाबत वाहतूक विभागाने महानगरपालिकेला लेखी माहिती देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासकीय दिरंगाईमुळेच या मार्गावर ‘मृत्यूप सापळा’ तयार झाला असून, तांत्रिक त्रुटी दूर न केल्यास भविष्यात अधिक जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पहिल्या रेल्वे गेटजवळ लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे नागरिकांना काँग्रेस विहिरीजवळून विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो. अशातच अवजड वाहनांचा वेगही या भागात जास्त असल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस आणि पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. याप्रकरणी दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.