बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या गाळ्यांचा भाडेकरार संपूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या मुद्द्यावरून नगरसेवकांनी प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून शहरातील अनधिकृत बांधकामे आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले.
बेळगाव महानगरपालिकेच्या सोमवारी पार पडलेल्या कौन्सिल सभेत नगरसेवक रवी धोध्रे आणि रियाज किल्लेदार यांनी आक्रमक भूमिका मांडली. पालिकेच्या अखत्यारीतील अनेक गाळ्यांची मुदत संपली असली तरी ते पुन्हा ताब्यात घेण्यात अधिकारी अपयशी ठरले असून, यामुळे पालिकेचा महसूल बुडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावर प्रतिक्रिया देताना महापौर मंगेश पवार यांनी पालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगितले. ज्या गाळ्यांची मुदत संपली आहे, अशा सर्व मालमत्तांचे तातडीने सर्वेक्षण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महानगरपालिका आयुक्त कार्तिक यांनी या प्रकरणाची दखल घेत, कार्यक्षेत्रातील किती गाळ्यांचा भाडेकरार संपुष्टात आला आहे, याची सविस्तर माहिती घेण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
नगरसेवक राजशेखर डोणी यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. शहरात घरबांधणी परवान्यासाठी एजंटांचा सुळसुळाट झाला असून त्यांच्यामार्फतच कामे केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अधिकारी केवळ गरिबांच्या झोपड्यांवर कारवाई करतात, मात्र धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली.

महापौर मंगेश पवार यांनी पालिकेतील एजंटांचा त्रास थांबवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना कडक सूचना देऊन पारदर्शक कारभार करावा, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले.
नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी स्थानिक नागरी प्रश्नांकडे लक्ष वेधले. कपिलेश्वर कॉलनी आणि मुचंडी माळ परिसरातून जाणाऱ्या बल्लारी नाल्याची दुरुस्ती, तसेच सांडपाणी, बोअरवेल आणि विहिरींच्या स्वच्छतेसाठी वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला उपमहापौर वाणी जोशी, आमदार आसिफ सेठ, अजिम पटवेगार, सोहेल संगोळी, हनुमंत कोंगाळी यांच्यासह इतर नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.





