बेळगाव लाईव्ह :चोर्ला घाटात गेल्या ऑक्टोबर 2025 मध्ये घडलेल्या 400 कोटी रुपयांच्या जुन्या 2 हजारांच्या नोटा असलेले दोन कंटेनर लुटल्याप्रकरणी तपास कार्य हाती घेण्यासाठी बेळगाव पोलिसांनी केलेल्या फिर्याद दाखल करण्याच्या आवाहनानुसार मी तक्रार दाखल करण्यास तयार आहे असे स्पष्ट करून कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य दिशेने करून सर्व खरा प्रकार उघडकीस आणावा, अशी विनंती सदर प्रकरणात अपहरण व सुटका झालेले संदीप पाटील यांनी केली आहे.
कर्नाटक -गोवा सीमेवरील चोर्ला घाटामध्ये घडलेल्या 400 कोटींच्या दरोड्यासंदर्भात ते नाशिक, महाराष्ट्र येथे पत्रकार श्रीकांत काकतीकर (बेळगाव) व भरत गोसावी (नाशिक) यांच्याशी बोलत होते. माझ्या अपहरणासंदर्भात मी केलेल्या तक्रारीची दखल घेत नाशिक पोलीस योग्य रीतीने तपास करत आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चोर्ला घाटातील दरोड्यासंबंधी कोणीही फिर्याद दिल्यास आम्ही तक्रार दाखल करून घेऊ असे आवाहन केले असेल तर मी त्यांच्याकडे दरोड्यासंदर्भात तक्रार करण्यास तयार आहे.
थोडक्यात जर कर्नाटक पोलीस देखील या प्रकरणाचा तपास करणार असतील तर मी त्यांच्याकडे तक्रार नोंदवण्यास तयार आहे. कर्नाटकातून चोर्ला-गोवा मार्गे बालाजी ट्रस्टकडे जाणाऱ्या 400 कोटी रुपयांची जी लूट झाली, त्या संदर्भात जयेश कदम याने मला सांगितल्याप्रमाणे सदर लूट ही कर्नाटक हद्दीतच झाली आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करून हा सर्व प्रकार उघडकीस आणावा, असे संदीप पाटील म्हणाले.
जयेश कदम याने मला दिलेल्या माहितीनुसार दरोड्याची घटनेनंतर काही दिवसांनी किशोर सावळा समजले की अरजीत याच्या सांगण्यावरून विराट गांधी यांनी हा गेम केला त्यानंतर किशोर सावळा याने अरजीत याला अमली पदार्थ तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात दुबईमध्ये अडकून टाकले खुद्द जयेश कदम यांनी हा खुलासा केला आहे, असेही संदीप पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कथीत 400 कोटींच्या दरोडा प्रकरणाचे धागेद्वारे गुजरातपर्यंत पोहोचले असून तेथील एका आश्रमातून ही रक्कम तिरुपतीला नेण्यात येत होती.
दोन हजाराच्या जुन्या नोटा बदलून नव्या चलनी नोटा आणण्यासाठीचा हा प्रयत्न होता. विराट गांधी, विशाल नायडू, जयेश कदम, सुनील धुमाळ आदी नावे यासंदर्भात ठळक चर्चेत आहेत. चोर्ला घाटात 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री जुन्या नोटांनी भरलेले दोन कंटेनर गायब झाल्याची तक्रार आहे.
किशोर सावळा या नावाचीही प्रामुख्याने चर्चा सुरू असून विराटचा मित्र सय्यद अझर व दुबईत असणारा अरजीत यांनी कंटेनर मधून नोटा पाठविण्यास मदत केल्याचे कळते. गुजरातच्या सीमेवरील सिल्वासा येथून ही रक्कम तिरुपतीला नेण्यात येणार होती.





