बेळगाव लाईव्ह : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेने सामाजिक बांधीलकी जपत एका गरजू बालकाच्या उपचारासाठी ५,००० रुपयांची आर्थिक मदत केली आहे. शाळेत आयोजित ‘आठवडा बाजार’ उपक्रमातून विद्यार्थ्यांनी मिळवलेला नफा या उदात्त हेतूसाठी देण्यात आला.
घरात खेळत असताना उकळत्या पाण्याच्या भांड्यात पडल्याने गंभीर भाजलेल्या ३ वर्षीय मास्टर मदन बाळराज रामण्णागोल याच्या उपचारासाठी ही मदत देण्यात आली. मदन सध्या केएलई रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असून त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ही परिस्थिती पाहून शाळेचे ब्रँड ॲम्बेसेडर संतोष आर. दरेकर, मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे आणि शिक्षकवृंदाने या उपक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचलवार यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ खरेदी-विक्री, पैशांचे व्यवस्थापन आणि संवाद कौशल्याचे धडे मिळाले नाहीत, तर त्यांच्यात मदतीची भावनाही रुजली असल्याचे सुदाम मंचलवार यांनी म्हटले.
यावेळी लेकव्ह्यू हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. गिरीश सोनवळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.





