बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेचा आगामी अर्थसंकल्प शहरवासीयांच्या आशा-आकांक्षांना पूरक आणि विकासाला गती देणारा असेल, अशी ग्वाही महापौर मंगेश पवार यांनी दिली असून अर्थसंकल्पपूर्व बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
बेळगाव महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये आयोजित अर्थसंकल्पपूर्व आढावा बैठकीत महापौर मंगेश पवार बोलत होते. यंदाचे बजेट तयार करताना जनतेच्या सूचना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन मंगेश पवार यांनी दिले. यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावताना महापालिकेला काही महत्त्वपूर्ण सल्ले दिले.
दरवर्षी बजेट बैठकीत आम्ही प्रशासनाला सल्ले देतो, मात्र ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती दरवर्षी पाहायला मिळते, अशी खंत विजय मोरे यांनी व्यक्त केली. बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, असे विजय मोरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना बजावले.
महापालिका हद्दीतील स्मशानभूमींची दुरवस्था तातडीने सुधारण्याची गरज माजी महापौर विजय मोरे यांनी व्यक्त केली. गेल्या १५ वर्षांपासून आपण या विषयाचा पाठपुरावा करत असून, प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजी किंवा गॅस प्रणालीवर अंत्यक्रिया करण्यावर भर द्यावा, सदाशिवनगर स्मशानभूमी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही कित्येक वर्षांपासून गॅसवर अंत्यसंस्कार करत असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
तसेच १ कोटी ३० लाख रुपये खर्चून उभारलेल्या हायटेक स्मशानभूमीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्याची चौकशी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विजय मोरे यांनी केली.
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विजय मोरे यांनी नाविन्यपूर्ण उपाय सुचवला. बेळगावच्या चारी बाजूंनी महापालिकेच्या रिकाम्या जागांवर मोठे मॉल बांधून ते भाड्याने द्यावेत आणि त्यातून मिळणारे उत्पन्न जनतेच्या सोयींसाठी खर्च करावे, केवळ जनतेकडून कराच्या स्वरूपात पैसे वसूल करायचे आणि कामे मात्र काहीच करायची नाहीत, अशी भूमिका प्रशासनाने घेऊ नये. जर जनतेचे प्रश्न सुटले नाहीत, तर पुढच्या बजेटमध्ये आम्ही या विषयावर आक्रमक पवित्रा घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.

व्यापारी आणि उद्योजकांच्या वतीने चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर यांनी ई-खाते वितरण प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली. महापालिकेकडून दिले जाणारे ई-खाते मिळवण्यात नागरिकांना अनेक अडचणी येत असल्याचे प्रभाकर यांनी निदर्शनास आणून दिले. उद्यमनगर सारख्या औद्योगिक वसाहतींमध्ये वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा होत नसल्याने उद्योजकांचे नुकसान होत असून, येथील मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी प्रभाकर यांनी केली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी, विरोधी पक्षनेते सोहेल संगोळी आणि महापालिका आयुक्त कार्तिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.





