बेळगाव लाईव्ह : कंग्राळी (बी.के.) गावात सुरू असलेल्या जल जीवन मिशन व रस्त्याच्या कामामुळे विकासाऐवजी नागरिकांचे हाल वाढले आहेत. गावातील मुख्य रस्त्याच्या एका बाजूला खोदाई करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूचे रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. परिणामी मागील एक महिन्यापासून रस्त्याची दुरवस्था झाली असून सदर काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
कंग्राळी (बी.के.) गावात गेल्या महिनाभरापासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामासह रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. महिना उलटला तरी गावातील मुख्य रस्त्याचे एका बाजूचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे, तर दुसऱ्या बाजूला जल जीवन मिशन योजनेचे पाईप घालण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. त्यामुळे धुळीने माखलेल्या या रस्त्यावरून ये-जा करणे गैरसोईचे होत आहे.
रस्त्याच्या अर्धवट कामामुळे विशेष करून रात्रीच्या वेळी नवख्या वाहन चालकांच्या बाबतीत अपघाताचा धोका वाढला आहे. सध्या या अपूर्ण कामांचा थेट फटका गावातील दैनंदिन जीवनाला बसत असून गावात येणारी बससेवा बंद झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी यमुनापूरपर्यंत पायी चालत जावे लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकत नसून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाहूनगरकडून येणारी बस थेट गावात प्रवेश न करता तलाव परिसरातच वळत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर विकास कामे आवश्यक असली तरी ती वेळेत आणि नियोजनबद्धरीत्या पूर्ण होणे तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून रखडलेले रस्त्याचे आणि जलजीवन मिशनचे काम त्वरेने पूर्ण करावे. तसेच बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी कंग्राळी (बी.के.) ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना ग्रामपंचायत सदस्या रेखा इंडीकर यांनी सांगितले की, कंग्राळी (बी.के गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत ही अतिशय चांगली गोष्ट असली तरी गावच्या प्रमुख रस्त्याच्या ठिकाणी एकाच वेळी जलजीवन मिशनचे काम आणि रस्त्याचे बांधकाम असे दोन कामे एकाच वेळी हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे गावात येणारी बस सेवा बंद झाली असल्याने विशेष करून विद्यार्थीवर्गाची गैरसोय होत आहे. गावात न येता बस शाहूनगर मार्गे जात असल्यामुळे गावातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बस धरण्यासाठी शाहूनगर अथवा यमनापूरपर्यंत चालत जावे लागत आहे परिणामी वेळेचा अपव्यय होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आमच्या गावातील जलजीवन मिशनचे काम गेल्या 2021 पासून सुरू आहे ते आजपर्यंत पूर्ण झालेले नाही, असे खेदाने सांगून सध्या एकाच वेळी सुरू असलेली दोन विकास कामे गावकरी आणि शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांसाठी त्रासदायक ठरत आहेत. तेव्हा संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सदर महिनाभरापासून सुरू असलेली विकास कामे युद्धपातळीवर पूर्ण होतील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शेवटी रेखा इंडीकर यांनी केली





Shahu nagar to kangrali bk road work also going very slow…….