बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याच्या हक्काचे पाणी हुबळी-धारवाडला पळवले जात असून, स्थानिक नेते मात्र आपल्या हक्कासाठी लढण्यास असमर्थ ठरत आहेत, अशी घणाघाती टीका राजकुमार टोपण्णावार यांनी केली आहे. बेळगावच्या सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राजकुमार टोपण्णावार म्हणाले की, “खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आणि सवदत्तीची जीवनवाहिनी असलेली मलप्रभा नदी आज केवळ हुबळी-धारवाडची तहान भागवत आहे. इकडे बेळगावमधील शेती आणि लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. हिडकल धरणाचे पाणी तिथल्या औद्योगिक वसाहतींना दिले जाते, तर बेळगावमधील उद्योगांना आजही टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.”
नेत्यांच्या कार्यशैलीवर निशाणा साधताना ते म्हणाले की, “आम्ही असे नेते निवडून देतो जे केवळ पोकळ राष्ट्रवाद आणि धार्मिक घोषणा देण्यात धन्यता मानतात, पण स्थानिक प्रश्नांवर मात्र गप्प बसतात.
बेळगावला आता नौटंकी करणाऱ्यांची नाही, तर कणा असलेल्या खंबीर नेत्यांची गरज आहे.” तसेच, बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार केवळ प्रल्हाद जोशींना खूश करण्यासाठी काम करत असून, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप करत त्यांनी जगदीश शेट्टर यांना यावर त्यांची भूमिका काय, असा सवालही विचारला आहे.




