बेळगाव लाईव्ह : शहरातील कॅम्प परिसरातील नामांकित सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये बुधवारी दुपारी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या इब्राहिम आगा (वय १४) या विद्यार्थ्यावर वरिष्ठ वर्गातील १० ते १२ मुलांच्या टोळीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात इब्राहिमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी विद्यार्थी इब्राहिम आगा याने दिलेल्या माहितीनुसार “मी शाळेच्या मधल्या सुट्टीत पायऱ्यांवरून जात होतो, तेव्हा दहावीच्या काही मुलांनी मला विनाकारण मागे खेचले. मी त्यांना जाब विचारला असता, त्यांनी मला मारहाण सुरू केली. त्यातील एकाने माझ्या डोक्यावर स्टीलची बाटली जोरात मारली. यात आपल्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा सर्व प्रकार शाळेच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी घडला,” असे जखमी इब्राहिमने रुग्णालयातून सांगितले.
इब्राहिमच्या वडिलांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “दहा ते बारा मुलांच्या टोळीने माझ्या मुलावर काचेच्या बाटल्यांनी हल्ला केला आहे. त्याच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

नववी-दहावीतील मुलांच्या या कृत्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, शाळेकडे दाद मागितली असता, “शाळेबाहेर घडलेल्या घटनेची जबाबदारी आमची नाही,” असे उत्तर देऊन प्रशासनाने हात वर केल्याचे वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
कॅम्प पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमी इब्राहिमचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज आणि विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.





