बेळगाव लाईव्ह :मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. 23 जानेवारी 2026 रोजी शहरातील विविध भागांतून मोबाईल फोन चोरीस गेलेल्या प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून एकूण 36 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत ₹4,33,450 इतकी आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या प्रकरणी बेळगाव शहरातील संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली.
मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित करून शहरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी मोबाईल फोन व मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहावे, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.





