बेळगाव लाईव्ह : मटका जुगार आणि गांजाचे सेवन अशा बेकायदेशीर प्रकरणात बेळगाव पोलिसांनी काल सोमवारी दोघा मटका बुकिंसह एकूण तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील रोख 1220 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रभाकर रामचंद्र पाटील (वय 58, रा. शिवाजी गल्ली, कंग्राळी खुर्द बेळगाव), मोहन मालिक खड्डवाली (वय 24, रा. लक्ष्मीनगर तिसरा क्रॉस, काकती बेळगाव) आणि महादेव लक्ष्मण परकाळे (वय 38, रा. कणबर्गी बेळगाव) अशी आहेत. यापैकी प्रभाकर पाटील हा बेळगाव शहरातील चित्राहंस टॉकीज रस्त्याच्या आडबाजूस असलेल्या सार्वजनिक मुतारी जवळ मुंबई मटका या जुगारावर लोकांचे पैसे लावत होता.
त्यावेळी खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद अदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून प्रभाकर याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या जवळील रोख 1220 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. दुसऱ्या प्रकरणात मोहन खड्डवाली हा काकती गावाच्या हद्दीतील काकती -सोनट्टी रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका या जुगारावर लोकांचे पैसे लावत होता.
त्यावेळी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्याबरोबरच त्याच्याकडील जुगाराचे साहित्य जप्त केले. वरील दोन्ही प्रकरणी अनुक्रमे खडेबाजार व काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
तिसऱ्या प्रकरणात कणबर्गी बसस्टॅन्ड जवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाच्या नशेत विचित्र वर्तन करणाऱ्या महादेव परकाळे याला मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.





