belgaum

बेळगावात 28 वा ‘हरे कृष्ण रथयात्रा’ २४ व २५ जानेवारी रोजी भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल*

0
1294
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), बेळगाव यांच्या वतीने सलग 28 व्या वर्षी भव्य ‘हरे कृष्ण रथयात्रा महामहोत्सव’ आयोजित करण्यात आला असून तो शनिवार, 24 ते रविवार, 25 जानेवारी 2026 या कालावधीत मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे, अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


शनिवार 24 जानेवारी रोजी भव्य रथयात्रा
मुख्य रथयात्रा शनिवार, 24 जानेवारी रोजी दुपारी होणार असून त्यानंतर 24 व 25 जानेवारी रोजी दररोज सायंकाळी टिळकवाडीतील शुक्रवार पेठ येथील इस्कॉन मंदिराजवळील मैदानावर भव्य पंडालमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या रथयात्रेत भगवान श्री श्री राधा–कृष्ण आणि निताई गौर सुंदर यांच्या भव्य रथातून दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. रथ सुंदर फुलांनी, वस्त्रांनी सजवण्यात येणार असून संपूर्ण मार्ग ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या जयघोषाने दुमदुमणार आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू तसेच अमेरिका व इतर देशांतील हजारो भक्त या यात्रेत सहभागी होणार आहेत.


विख्यात संत व प्रवचन
या महामहोत्सवासाठी इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, परमपूज्य सुंदर चैतन्य स्वामी महाराज (मॉरिशस), श्री दयाल चंद प्रभू (मुंबई) तसेच भक्ती रसामृत स्वामी महाराज उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.

 belgaum


महोत्सवाची वैशिष्ट्ये
• भगवान श्रीकृष्णाच्या लीलांवर आधारित चित्ररथ व सांस्कृतिक देखावे
• आकर्षक बैलगाडी मिरवणूक
• सुमारे ५० हजार प्रसाद पाकिटांचे वितरण
• श्रील प्रभुपाद लिखित भगवद्गीता व आध्यात्मिक ग्रंथांचे वितरण
• नागरिकांकडून पुष्पवृष्टी, पाणी व शरबत वाटप
• संपूर्ण मार्गावर रांगोळी व भगवे ध्वजांची सजावट
इस्कॉन मंदिराच्या मागील मैदानात भव्य पंडाल, विविध स्टॉल्स, भजने, कीर्तन, आरती, बालकार्यक्रम, प्रवचने, भगवद्गीता प्रदर्शन, स्लाईड शो, ध्यान केंद्र (मेडिटेशन पार्क), भक्तीपर वस्तूंचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत.


विशेष म्हणजे ‘गो-सेवा’ दालनात गोमूत्र व शेणापासून बनवलेली उत्पादने उपलब्ध असतील. दररोज रात्री ५० हजार भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जाणार असून, एकूण सव्वा लाखांहून अधिक भाविक सहभागी होतील, असा अंदाज आहे.


इस्कॉनचे सामाजिक कार्य
इस्कॉन बेळगाव शाळा–महाविद्यालयांत व्यक्तिमत्त्व विकास व तणावमुक्ती विषयक व्याख्याने घेतो. ‘फूड फॉर लाईफ’ उपक्रमांतर्गत दरमहा हजारो गरजूंना अन्नदान केले जाते. तसेच जांबोटी येथील आरोग्य केंद्रातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते.


रथयात्रेचा तपशील
दिनांक : शनिवार, 24 जानेवारी 2026
एकत्र येण्याचे ठिकाण : धर्मवीर संभाजी चौक (बोगारवेस) – दुपारी 12.45
आरती : दुपारी 1.00
रथयात्रा प्रारंभ : दुपारी 1.30


मार्ग :
धर्मवीर संभाजी चौक – कॉलेज रोड – यंदे खूट – समादेवी गल्ली – खडेबाजार – गणपत गल्ली – मारुती गल्ली – किर्लोस्कर रोड – रामलिंग खिंड गल्ली – पाटील गल्ली – कपिलेश्वर रोड – एस.पी.एम. रोड – खडेबाजार शाहापूर – नाथ पै चौक – बी.एम.के. आयुर्वेदिक कॉलेज रोड – गोवावेस – इस्कॉन मंदिर मागील मैदान.
रथयात्रा सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मंदिर परिसरात पोहोचून समाप्त होईल.

पत्रकार परिषदेस उपस्थित
रथयात्रा समन्वयक श्री राम दास, श्री बलराम भक्त दास, श्री नागेंद्र दास, श्री निताई निमाई दास, श्री अमृत कृष्ण दास, श्री वदान्य चैतन्य दास, श्री श्वेत निताई दास, श्री श्री रामायण दास, श्री कृष्णाश्रय दास आदी उपस्थित होते.
इस्कॉन बेळगावच्या वतीने सर्व बेळगाववासीयांना या भक्तीमय महामहोत्सवात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.