बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील मुख्य सर्कलवर असलेले घड्याळ गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.
शहराचा महत्त्वाचा ‘लँडमार्क’ असलेल्या या चौकातील घड्याळ बंद असल्यामुळे कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवाशांना वेळेचा अंदाज घेण्यात अडचणी येत आहेत.
या घड्याळाच्या देखभालीची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाकडे आहे. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे हे घड्याळ बंद पडले असून, अनेक दिवस उलटूनही त्याकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. या चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते, अशा वेळी हे घड्याळ केवळ शोभेची वस्तू बनून राहिल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
यापूर्वीही अनेकदा हे घड्याळ बंद पडले होते. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र आता हे घड्याळ पुन्हा बंद झाले आहे. प्रशासनाने केवळ मलमपट्टी न करता या घड्याळाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि या चौकातील हि ऐतिहासिक खूण योग्य पद्धतीने जतन करावी अशी मागणी पुढे येत आहे.

शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, पण आहे त्या सुविधांची देखभाल केली जात नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत असून आता महानगरपालिका प्रशासन याकडे कधी लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सार्वजनिक ठिकाणी घड्याळे बसवण्यामागे केवळ वेळ दाखवण्यापुरते कारण नाही. शहरातील रहदारीसह व्यस्त जीवनातील नागरिकांना वेळेचा अंदाज देणे, चौकांमध्ये गजबजलेली हालचाल नियंत्रीत करणे आणि शहराची सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक ओळख अधोरेखित करणे यासाठीही घड्याळे महत्त्वाची भूमिका बजावतात. धर्मवीर संभाजी चौकातील घड्याळ बंद पडल्यामुळे केवळ वेळ जाणवण्यात अडचण येत नाही, तर शहराच्या सौंदर्य आणि ऐतिहासिक ओळखीलाही धक्का बसतो.




