बेळगाव लाईव्ह : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगची गंभीर समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी पार पडलेल्या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी राणी चन्नम्मा चौक, गोगटे चौक आणि आरपीडी यांसारख्या प्रमुख ठिकाणच्या वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.
शहरातील विविध विभागांच्या रिकाम्या जागा आणि खाजगी भूखंड ओळखून तिथे वाहन पार्किंगची सोय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरू केली जाणार आहे.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रिक्षा चालकांनी केवळ नियुक्त स्टँडवरच रिक्षा उभ्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले.

तसेच, शहरात प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यापूर्वी रस्ते सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी-कोल्हापूर रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक लावण्याबाबत पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सूचना केल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




