belgaum

बेळगावसाठी आठवणीतले अजितदादा…

0
1550
 belgaum

बेळगाव लाईव्ह :दहा ते पंधरा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या अर्थकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, त्याचबरोबर बेळगावसह सीमाभागालाही हा मोठा धक्का आहे.


“अजितदादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण बेचव आहे,” अशा शब्दांत सर्वत्र श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. बुधवार, २८ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काळा दिवस ठरला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्यानंतर अजितदादांचे निधन हे महाराष्ट्रासाठी अपूरणीय नुकसान मानले जात आहे.


गेल्या पंधरा वर्षांपासून बेळगावसह सीमाभागातील आर्थिक, शैक्षणिक आणि मराठी भाषेच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची सुरुवात अजितदादा पवार यांनीच केली होती. ही मदत सुरू ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे सीमाप्रश्न असो किंवा बेळगावातील मराठी भाषिकांची भावना—अजितदादा यांच्याशी एक वेगळं नातं जोडलेलं होतं.


सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सीमावादाच्या खटल्याबाबतही गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांनी सातत्याने वकिलांशी संपर्क ठेवत पाठपुरावा केला. मागील वर्षी दिल्ली येथे झालेल्या बैठकीदरम्यान समितीच्या शिष्टमंडळाला दिलेले त्यांचे आश्वासन सीमावासीयांसाठी अत्यंत दिलासादायक ठरले होते.


अर्थमंत्री पदावर असताना महाराष्ट्र शासनाकडून शैक्षणिक संस्थांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात आलीच; शिवाय बेळगावच्या मराठा समाजालाही त्यांनी मोठी मदत दिली. थेट सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होता देखील अजितदादा खाजगी कार्यक्रमांसाठी अनेकदा बेळगावला येत असत. मागील वर्षी 27 सप्टेंबर 2024 साली चंदगड दौऱ्यावर जाताना बेळगाव विमानतळावर त्यांची कार्यकर्त्यांशी झालेली भेट हीच बेळगावमधील त्यांची शेवटची भेट ठरली.


बेळगावच्या मराठी माणसाची नाळ जुळलेला महाराष्ट्रातील हा नेता आपल्यातून निघून जाणे, हे सीमावासीयांसाठीही मोठे दु:ख आहे. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक संस्थांसाठी उभा केलेला आर्थिक आधार आणि मराठी भाषेप्रती असलेली आपुलकी कधीही विसरता येणार नाही.


अजितदादा पवार हे कायम स्मरणात राहतील—एक कणखर नेता, संवेदनशील अर्थतज्ज्ञ आणि सीमावासीयांचा खरा आधार म्हणून.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.