बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रिक्षा प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. येत्या दोन महिन्यांत शहरात मीटरप्रमाणे रिक्षा भाडे आकारणी अनिवार्य करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत.
यासाठी उद्यापासूनच (गुरुवार) प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वजनमाप विभागाने समन्वय साधून रिक्षा मीटरच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी सकाळी आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील रिक्षांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला असता, शहरात सध्या ११ हजार रिक्षा कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. या सर्व रिक्षांच्या मीटरची तपासणी आणि कॅलिब्रेशन करण्यासाठी परिवहन विभागाने तीन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ती अमान्य करत ६० दिवसांचा सक्त कालावधी दिला आहे.

जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांच्या सुविधेसाठी उद्याच नवीन भाडेतक्ता प्रसिद्ध केला जाईल. वजनमाप विभाग आणि आरटीओने रिक्षा संघटनांच्या सहकार्याने नियुक्त केलेल्या सात एजन्सीमार्फत मीटरची अचूकता तपासावी. ज्या रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण पूर्ण होईल, त्यावर विशेष ‘स्टिकर’ लावले जातील, जेणेकरून प्रवाशांना मीटर मोजणी झालेल्या रिक्षा ओळखणे सोपे जाईल. दोन महिन्यांनंतर शहरात केवळ मीटरप्रमाणेच भाडे आकारले जाईल याची खातरजमा पोलिसांनी करावी, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत रस्ते सुरक्षेशी संबंधित अन्य महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली. रिक्षाचालक आणि मालक संघटनांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे बेळगावमधील रिक्षा प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून मनमानी भाडे आकारणीला चाप बसणार आहे.





