बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळावरून गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाच्या विमानफेऱ्या अचानक बंद करण्यात आल्याने व्यापारी आणि नियमित प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या व्यापार आणि औद्योगिक विकासावर होत असून, या प्रश्नी ‘बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करूनही सुधारणा होत नसल्याने लवकरच मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा चेंबरने दिला आहे.
चेंबरच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष प्रभाकर नगरमुनोळी यांनी सांगितले की, विमानफेऱ्यांच्या अभावामुळे शहरातील व्यावसायिक समुदायाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. ‘उडान-३’ योजनेअंतर्गत बेळगावला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळाली होती, ज्यामुळे हुबळी आणि गोव्यातील प्रवासी देखील बेळगाव विमानतळाला पसंती देत होते. मात्र, आता या सेवा बंद झाल्याने प्रत्येक परवानाधारक व्यापारी आणि उद्योजकाचे मोठे नुकसान होत आहे.
नगरमुनोळी यांनी स्पष्ट केले की, या समस्येबाबत बेळगावच्या खासदारांची भेट घेऊन त्यांना व्यापाऱ्यांच्या अडचणींची जाणीव करून दिली जाईल. तसेच, १८ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट नियोजित असून, त्यावेळी बेळगावची विमानसेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी प्रकर्षाने मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानसेवा सुरू न झाल्यास संपूर्ण व्यापारी संघटना रस्त्यावर उतरून निदर्शने करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याप्रसंगी उद्योजक राम भंडारी, सचिन सबनीस, सतीश कुलकर्णी, अभय पै यांसह अन्य मान्यवरांनी विमानसेवेच्या आवश्यकतेवर मते मांडली. बेळगावसारख्या वाढत्या औद्योगिक केंद्रासाठी हवाई संपर्क तुटणे हे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी घातक असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.





