बेळगाव लाईव्ह :चोर्ला घाटातून कंटेनरमधून नेण्यात येत असलेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटांच्या लुटीप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या प्रकरणात मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता असून, तपास यंत्रणा अत्यंत गोपनीयतेत चौकशी करत आहेत.
या लुटीतील रक्कम ठाण्यातील एका नामांकित बिल्डराची असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, ती रक्कम नोटबंदीपूर्वीची जुनी चलनी नोटा असल्याची प्राथमिक माहिती आहे. इतकी मोठी रक्कम गोव्याच्या दिशेने कंटेनरमधून का आणि कुणासाठी नेली जात होती, याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
दरम्यान, फिर्यादी संदीप पाटील यांनी या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
“ही केवळ लूट नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत आहेत. यात कोणाकोणाचा सहभाग आहे, पैसा कुठून आला, कुठे जाणार होता आणि सध्या तो कुठे आहे – याचा उलगडा झाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चोर्ला घाटात नेमकी लूट कुणी केली? लुटलेले पैसे सध्या कुणाच्या ताब्यात आहेत? आणि हा पैसा काळ्या पैशाशी संबंधित आहे का? – या सर्व बाबींची चौकशी आता महाराष्ट्र पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आली आहे.
तपास जसजसा पुढे सरकतो आहे, तसतसे राजकीय व आर्थिक वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणावर पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





