बेळगाव लाईव्ह : सौन्दत्ती तालुक्यातील मुुरगोड गावाने आपली पारंपारिक ‘हिरवी बांगडी’ बनवण्याची कला आजही जिवंत ठेवली आहे. आता हे गाव उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद नंतर देशातील दुसरे आणि दक्षिण भारतातील पहिले अत्याधुनिक बांगडी निर्मिती केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.
मुुरगोडमध्ये अनेक पिढ्यांपासून काजगार समाजासह सर्व धर्मीय लोक बांगडी निर्मितीच्या व्यवसायात आहेत. सध्या गावात ३० युनिट्समध्ये १५०० हून अधिक कारागीर कार्यरत आहेत. फॅन्सी बांगड्यांच्या स्पर्धेतही या पारंपारिक अखंड काचेच्या बांगड्यांची मागणी टिकून आहे. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी येथील तरुणांनी ‘मुुरगोड बांगडी उत्पादन फाउंडेशन’ स्थापन करून सरकारकडे आधुनिक प्रकल्पाचा प्रस्ताव दिला होता.
या प्रस्तावाची दखल घेत राज्य मंत्रिमंडळाने गावाबाहेरील ५ एकर जमीन ३५ वर्षांच्या करारावर विनामूल्य देण्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सध्याच्या लाकडावर चालणाऱ्या जुनाट भट्ट्यांची जागा आता गॅसवर चालणारे आधुनिक तंत्रज्ञान घेणार आहे. यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि वेग दोन्ही वाढणार आहे.

धार्मिक कार्यासाठी मुुरगोडच्या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. उत्तर कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील जत्रांमध्ये या बांगड्यांची मोठी विक्री होते. “आधुनिक तंत्रज्ञानामुळे आमच्या या पारंपारिक कलेला आता जागतिक ओळख मिळेल,” अशी भावना मुुरगोड बांगडी उत्पादन फाउंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.
मातीच्या भट्टीत काचेचा तापलेला लगदा अवघ्या १० ते १५ सेकंदात गोलाकार फिरवून बांगडी तयार करण्याचे कसब येथील कारागीर पिढ्यानपिढ्या जपत आहेत. आता या कष्टाला आधुनिक यंत्रसामग्रीची जोड मिळाल्याने या उद्योगाला सोन्याचे दिवस येतील, अशी आशा व्यक्त होत आहे.





