बेळगाव लाईव्ह :सोशल मीडिया हाताळताना अथवा प्रत्यक्ष जगतात आपण फसवले जात आहोत असा जराजरी संशय आला तर तात्काळ आमच्याशी 112 क्रमांकावर संपर्क साधा किंवा आमच्या बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. आम्ही तात्काळ प्रतिक्रिया देऊन योग्य ती कार्यवाही करू, असे सांगून एकंदर कोणत्याही कारणास्तव सायबर गुन्हेगारीला बळी पडू नका, असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शहरवासियांना केले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज मंगळवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. पोलिस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, फंडात भरलेल्या पैशावर आणि ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांचे पैसे परत न देता फसवणूक करणाऱ्या श्री गणेश मासिक वार्षिक फंड या फंडचालकांविरुद्ध कॅम्प बेळगाव येथील काही महिलांनी आज तक्रार नोंदविली आहे.
हे प्रकरण अधिक तपासासाठी आम्ही गुन्हा शाखेच्या सहाय्य पोलिसायुक्तांकडे सोपविले आहे. यानिमित्ताने लोकांना माझी विनंती आहे की, सोशल मीडिया अथवा प्रत्यक्ष जगतात अतिशय आकर्षक व्याज दराच्या जाहिराती केल्या जात असल्यातरी त्यांचा लाभ घेण्यापूर्वी नागरिकांनी कृपया त्याची व्यवस्थित शहानिशा करावी. त्यासाठी पोलिसांकडे सहाय्य मागायला हरकत नाही. आम्ही संपूर्ण शहानिशा करून देऊ. कृपया सोशल मीडिया, युट्यूबवर जे आकर्षक वाटते त्यावर संशय घेण्यास सुरुवात करा.
सध्या आपल्या जिल्ह्यात डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना घडल्या आहेत. लक्षात घ्या सध्या प्रामुख्याने तीन पद्धतीने लोकांना जाळ्यात अडकून उभारले जात आहे. पहिली पद्धत म्हणजे शेअर मार्केटमध्ये दुप्पट फायदा करून देऊ वगैरे सारखे आमिष, लालसा दाखवणे. दुसरी पद्धत भीती दाखवणे, ज्यामध्ये तुमचे पार्सल आले असून त्यामध्ये अंमली पदार्थ आहेत. तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट करत आहोत, असे धमकावले जाते. कृपया सर्वांनी लक्षात घ्यावे डिजिटल अरेस्ट सारखी कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही. जर तुम्हाला तसे कोणी धमकावले तर न घाबरता शांतपणे धमकावणाऱ्याला थोडे थांबावयास सांगून जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती देऊन सतर्क करा.
त्यावर आम्ही तुम्हाला तात्काळ स्पष्टीकरण देऊ. धमकावणारे इतक्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात की पोलिसांची संपर्क साधू नका आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन ते तुम्हाला घाबरवतात. तथापि घाबरून जाण्याचे कारण नाही. तिसरी पद्धत वासना आधारित असते. ज्यामध्ये एखाद्या मुली समवेत तुमचे स्क्रीनशॉट घेतलेल्या अश्लील फोटो वापरून तुम्हाला ब्लॅकमेल केले जाण्याची शक्यता असते.
संपूर्ण देशात दरवर्षी ही सायबर गुन्हेगारी वाढत आहे. आमच्या कर्नाटक राज्यातच गेल्यावर्षी 2900 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. तेव्हा कृपया या तीन पद्धतीच्या धोक्यांमधून लोकांनी स्वतःला वाचवले पाहिजे. कोणत्याही क्षणी तुम्हाला जराजरी संशय आला तर तात्काळ आमच्याशी 112 क्रमांकावर संपर्क साधा किंवा आमच्या बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, आम्ही तात्काळ प्रतिक्रिया देऊन योग्य ती कार्यवाही करू असे सांगून एकंदर कोणत्याही कारणास्तव सायबर गुन्हेगारीला बळी पडू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शेवटी केले.





