बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदारसंघात एल अँड टी कंपनीच्या कामांबाबत भाजपने अचानक सुरू केलेले आंदोलन म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक या त्रासामुळे हैराण असताना याच लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन संशयास्पद होते, अशी टीका राजकुमार टोपन्नावर यांनी केली आहे.
राजकुमार टोपन्नावर यांनी निदर्शनास आणून दिले की, राज्यभरात पाणी खासगीकरणाला विरोध होत असताना एल अँड टी कंपनीशी करार करण्याचे पाप भाजप सरकारनेच केले होते. आज शहरात जो काही सावळागोंधळ सुरू आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या धोरणांवर आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळात समन्वय न राखता केवळ कंत्राटदारांचे भले करण्यासाठी घाईघाईने रस्ते आणि पदपथ बांधले गेले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
शहरात नव्याने बांधलेले रस्ते पुन्हा खोदले जात असल्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा पाण्यात जात आहे. एकदा रस्ते बनवण्यासाठी आणि पुन्हा तेच रस्ते तोडण्यासाठी जनतेला कर भरावा लागत आहे.

जर या लोकप्रतिनिधींना खरोखरच लोकांचे हित जपायचे होते, तर निविदा प्रक्रियेवेळी त्यांनी विरोध का केला नाही? सार्वजनिक निधीच्या या उधळपट्टीला जबाबदार कोण? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
दक्षिण मतदारसंघातील इतर निकृष्ट दर्जाच्या कामांवर हे लोकप्रतिनिधी कधी बोलणार का? असा प्रश्न विचारत, स्वतःच्या चुका झाकण्यासाठी आणि जनतेला गोंधळात टाकण्यासाठी सुरू असलेले हे आंदोलनाचे नाटक आता थांबवावे, अशा शब्दांत टोपन्नावर यांनी टीका केली आहे.





