बेळगाव लाईव्ह : चौथ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या (सबवे) कामाला सुरुवात झाल्यापासून बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. या चौथ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौथ्या रेल्वे गेटवरील रहदारी बंद अथवा मर्यादित झाल्यामुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणात तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाचा वापर करत आहेत. परिणामी, तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलावर वाहतुकीचा भार लक्षणीयरीत्या वाढला आहे.
यासोबतच काँग्रेस रोडसह शहरातील प्रमुख मार्गांवरही रहदारीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत या मार्गांवर काहीशी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, चौथ्या रेल्वे गेट येथे ₹21.08 कोटींच्या खर्चाने सबवे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे कंत्राट मंगळुरू येथील एस. व्ही. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. सदर सबवे 265 मीटर लांबीचा व 11.55 मीटर रुंदीचा असणार असून, वाहतुकीसाठी आधुनिक व सुरक्षित पद्धतीने उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे काम जुलै 2025 पासून सुरू झाले असून, एका वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.सध्या सुरू असलेल्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असला, तरी हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चौथ्या रेल्वे गेट परिसरातील वाहतूक कोंडी कायमची दूर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधित यंत्रणांनी कामाची गती वाढवून दिलेल्या मुदतीतच हे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा बेळगावकरांकडून व्यक्त होत आहे.




