बेळगाव लाईव्ह : ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी विविध जिल्ह्यांमधून सुमारे ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज बेळगावच्या पोलीस कवायत मैदानावर पोलीस आयुक्तांनी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांना मार्गदर्शन केले. ८ डिसेंबरपासून सुवर्ण सौधमध्ये होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उडुपी, धारवाड, बागलकोट, पीटीएस प्रशिक्षण केंद्र अशा विविध ठिकाणांहून सुमारे ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बेळगावात टप्प्याटप्प्याने तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व जवान सुवर्ण सौध आणि संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतील.
यावेळी मार्गदर्शन करताना शहर पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी माहिती दिली की, सर्व जवानांची सेवा सेक्टर स्तरावर नेमून देण्यात आली आहे.
व्हॉट्सॲपद्वारे कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती पुरवली जाईल. जवानांसाठी निवास, भोजन आणि अंघोळीसाठी गरम पाणी यांसारख्या सर्व मूलभूत सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, थंडीचा विचार करून उबदार ब्लँकेटही दिले जातील.
या बंदोबस्तात ‘प्रत्यक्ष’ उपस्थितीसोबतच डिजिटल हजेरीची व्यवस्था करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे ठिकाण नमूद असेल. कोणतीही अडचण आल्यास, तात्काळ पर्यवेक्षकाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
उत्तर कर्नाटकातील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने बेळगावात हे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते. ते यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहन भूषण बोरासे यांनी केले. यावेळी विविध भागातून आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


