बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य विणकर हितरक्षण समिती आणि दोड्डबळ्ळापूर टेक्स्टाईल वेव्हर्स असोसिएशन यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली राज्यातील विणकारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर धरणे सत्याग्रह केला.
सुवर्णसौध परिसरातील हलगा आंदोलन स्थळी आपल्या आंदोलनासंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना विणकर हितरक्षण समितीचे सदस्य शिवलिंग तिर्की यांनी सांगितले की, राज्यातील विणकारांची अवस्था अतिशय बिकट झाली असून त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
यासंदर्भात दोन वर्षे झाली आम्ही सरकार आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांना बैठक घेऊन विणकारांच्या यांच्या समस्या जाणून घेण्याची विनंती करत आहोत. विणकारांसोबत चर्चा करा, त्यांच्यासाठी हितावह योजना लागू करा असे आम्ही सांगत आहोत. टेक्स्टाईल आणि हॅन्डलूम क्षेत्र सुस्थितीत आणण्यासाठी 1500 कोटी रुपयांचे अनुदान आम्ही गेल्या दोन वर्षापासून मागत आहोत. तथापि सरकारने आजपर्यंत त्याची दखल अथवा एकही बैठक घेतली नाही.
मुख्यमंत्र्यांनीही विणकारांची विचारपूस केलेली नाही. सध्याच्या घडीला कोप्पळ, गदग, बेळगाव, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणच्या विशेष करून सध्या दोड्डळळापूर येथील विणकारांची परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. ते सर्वजण आजच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. तेंव्हा राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आमची भेट घेऊन ताबडतोब आमच्याशी बैठक केली पाहिजे.

तसेच आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. गेल्या 55 वर्षापासून काम करणाऱ्या विणकारांना मिळणारा 5000 रुपयांचा मासिक भत्ता वाढवून 10000 रुपये केला जावा. कामगार सुविधा उपलब्ध करून दिली जावी. गुजरात वगैरे राज्यातून आधुनिक स्पीड लुमवर तयार होऊन येणाऱ्या साड्यांच्या विक्रीवर बंदी घातली जावी, अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही हे आंदोलन करत आहोत अशी माहिती शिवलिंग तिर्की यांनी दिली.


