बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या सुमारे ४३ विभाग आणि निगम मंडळांमध्ये गेल्या २५-३० वर्षांपासून कंत्राटी व बाह्यस्रोत पद्धतीने सेवा देत असलेल्या ३ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी करत, अखिल भारतीय संयुक्त कामगार संघटना केंद्राच्या एआययुटीयुसी कर्नाटक राज्य समितीच्या नेतृत्वाखाली आज सुवर्णसौधसमोर ‘बेळगाव चलो’ हे भव्य आंदोलन यशस्वीपणे आयोजित करण्यात आले.
बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बाह्यस्रोत पद्धत समाप्त करण्यासाठी सरकार विधेयक आणत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय संयुक्त कामगार संघटना केंद्राच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी तीव्र आंदोलन केले. आरोग्य, शिक्षण, परिवहन, ऊर्जा, स्थानिक स्वराज्य संस्थांसह ४३ हून अधिक शासकीय विभागांमध्ये गेली दशके सेवा देत असलेल्या ३ लाखांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या तातडीने कायमस्वरूपी कराव्यात.
सध्या या कामगारांना एजन्सीच्या शोषणाचा सामना करावा लागत असून, त्यांना किमान वेतन, पीएफ, ईएसआय यांसारख्या कायदेशीर सुविधा मिळत नाहीत आणि नोकरी गमावण्याची असुरक्षितता आहे. अनेक न्यायालयांनी अशा दीर्घकाळ सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला असल्याने, सरकारने एकवेळची उपाययोजना म्हणून या कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम करावे, अशी आंदोलकांनि मागणी केली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सक्रमीकरण करताना थेट भरती प्रक्रिया राबवणे म्हणजे, वयोमर्यादा ओलांडलेल्या आणि शैक्षणिक पात्रता असूनही नवीन उमेदवारांशी स्पर्धा करू न शकणाऱ्या जुन्या कामगारांना नोकरीपासून वंचित ठेवणे आहे. हा त्यांच्यावर घोर अन्याय आहे. सरकारने कंत्राटी एजन्सी रद्द करण्याचा विचार योग्य असला तरी, वर्षानुवर्षे सेवा दिलेल्यांना कायम न करता कृपादृष्टी किंवा वयोमर्यादेत शिथिलता देऊन अडगुलं मडगुलं करू नये.
त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पदांवर कायम करावे; कायमस्वरूपी होईपर्यंत त्यांना समान कामासाठी समान वेतन द्यावे; तसेच, किमान वेतन सल्लागार मंडळाने अंतिम केलेले सुधारित किमान वेतन त्वरित २०२२ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करावे आणि कोणालाही कामावरून कमी करू नये, अशी मागणी एआययूटीयूसीने अधिवेशनात केली.
या आंदोलनादरम्यान राज्य सचिव के. सोमशेखर यादवगिरी यांनी आवाहन केले की, “सरकार आपोआप न्याय देईल या अपेक्षेने हात जोडून बसणे शक्य नाही. अशा परिस्थितीत दीर्घकाळ चालणारे समरशील आंदोलन उभे करूनच जनविरोधी सरकारला नमवता येईल. कामगारांनी सर्व ठिकाणी कामगार संघटना स्थापन करून, इतर सर्व कंत्राटी कामगारांसोबत एकत्र येऊन, एकाच व्यासपीठाखाली बलवान आणि दीर्घकाळ चालणारे आंदोलन उभारण्यासाठी पुढे यावे.”
एआययुटीयुसी राज्य समितीने पुकारलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सचिव के. सोमशेखर यादवगिरी, तसेच मंजुनाथ कैदाळे, वीरेश एन. एस., मल्लिकार्जुन एच. टी., महेश चीकलपर्वी, गंगाधर बडिगेर, एस. एम. शर्मा, मंजुनाथ कुक्कुवाड, तिप्पेस्वामी, हरीश म्हैसूर, महादेवी आणि सुरेश यांनी केले.




